Ad will apear here
Next
वसईचा वीर!


वसईच्या किल्ल्यावर यशस्वी चाल करून तिथल्या पोर्तुगीज सत्तेला खिंडार पाडणारे वीर चिमाजी अप्पा यांचा आज (१७ डिसेंबर) स्मृतिदिन!

चिमाजी उर्फ चिमणाजी अप्पा (इ. स. १७०७ - इ. स. १७४०) हे पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट यांचे पुत्र व बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. त्यांनी दोन वर्षं झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला. साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापन केली.

वसईची लढाई ऐतिहासिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. या कामगिरीसाठी चिमाजी अप्पांची नेमणूक झाली. आपल्या थोरल्या भावाचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. या लढाईची कथाही तितकीच विस्मयजनक व नाट्यमय आहे.



१७ फेब्रुवारी १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली.

अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला.

आपले वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद झाले.

शेवटी १६ मे १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याचा सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी बुरुजांवरून पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.

या भडिमारापुढे पोर्तुगीज बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली.

शरण आले असताही आपल्या सैन्यास मानाने वाट काढून द्या, अशी विनवणी पोर्तुगीज सैनिकांनी केली. चिमाजींनी ती दिलदारपणाने मान्य केली. त्यामुळेच काही सैनिक दीव, दमणला, तर काही गोव्याला पोहोचू शकले.

असे चिमाजी अप्पा. आपण स्वतः किंवा चिरंजीव सदाशिवरावभाऊ केव्हाही ‘पेशवा’ बनणार नाही, हे ठाऊक असूनही ते कायमच पेशवाईशी एकनिष्ठ राहिले.

त्यांच्या स्मृतींना वंदन!

- भारतकुमार राऊत


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RVNTCT
Similar Posts
साम्यवादाचा जनक १९व्या व २०व्या शतकात ज्याच्या क्रांतिकारी विचारांनी अवघ्या जगाला भुरळ घातली व निम्म्या जगातील राज्यव्यवस्था पार बदलून गेली, असा साम्यवादी विचारसरणीचा उद्गाता कार्ल मार्क्स याचा आज (१३ मार्च) स्मृतिदिन!
सुंदर व सत्शील दुर्गाबाई! मराठी बोलपटाचा पहिला स्त्री चेहरा दुर्गा खोटे यांचा आज (१४ जानेवारी) जन्मदिन. त्यांच्या रूपेरी स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली! ‘अयोध्येचा राजा’ या मराठी चित्रपटाबरोबर चित्रपट ‘बोलू’ लागला. या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. १९०५ साली जन्मलेल्या दुर्गाबाईंनी
निळा म्हणे...! महाराष्ट्राच्या संतपरंपरेने श्री ज्ञानेश्वरांपासून तुकडोजी व गाडगेबाबांपर्यंत अनेक अनमोल मणी जोडले; पण त्यातले काही विस्मृतीत गेले. संत निळोबाराय त्यापैकीच एक. त्यांची आज (चार मार्च) पुण्यतिथी.
गुरूचा वाढदिवस! ज्याच्या पत्रिकेतील गुरू बलवान, तो आयुष्यात यशस्वी ठरतो व दुसऱ्यांवर प्रभुत्व गाजवतो, अशी समजूत आहे. अशा सर्वशक्तिमान गुरूला प्रणाम! ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांनी गुरू या सूर्यमालिकेतील सर्वांत मोठ्या ग्रहाचा शोध लावला तो आजच्याच दिवशी (सात जानेवारी) १६१० या वर्षी.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language